Wednesday 17 March, 2010

प्रथा, परंपरा आणि मिमांसा - गुढी पाडवा

महाराष्ट्रातील हिंदु नववर्षाप्रित्यर्थ गुढीपाडवा हा सण साजरा करतात तर याच दिवशी आंध्रप्रदेशातील व दक्षिणेतील काही भागातील लोक नवीन वर्ष उगाडी यानावाने साजरा करतात. प्रत्येक भागातील सण साजरा करण्याच्या प्रथा वेगळया आहेत, हे आपण जाणताच.

महाराष्ट्रातील गुढीपाडवा या नववर्षदिनी घरासमोर गुढी उभारली जाते. कडुनिबांच्या पानांमध्ये जिरे, गुळ आणि चिंच मिसळुन बारीक पेस्ट केली जाते व ती सकाळी उठल्यावर खाल्ली जाते.

कुडाळ मुक्कामी गुढी पाडवा हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला. श्री. प्रकाश याने स्वप्रयत्नाने उंच ताशीव बांबू आणला गेला. हा बांबु आणताना तो जमिनीला टेकू नये याची विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी हा बांबू दोन स्टूलांवर ठेऊन तो स्वच्छ करून त्यावर गडु घट्ट बसावा म्हणून त्याला लाल फडके सुतळीने गुंडाळले गेले. गडुवर हळद, कुंकु यांनी स्वस्तिक वगैरे हिंदु धर्मातील शुभचिन्हे रेखाटली गेली. गडू म्हणजेच कलश फुलांनी सजविला गेला. नवीन वस्त्र त्या गडुखाली ठेवले गेले व तो गडू उभ्या केलेल्या वेळुवर घट्ट बसविला गेला. त्याला गावठी चाफ्याच्या फ़ुलांचा हार घातला गेला.
तत्पूर्वी गुडीच्या खालील जागा शेणाने स्वच्छ सारविली गेली. सारविलेल्या जमिनीवर लाल रंगाचा पाट ठेवला गेला. पाटासभोवती रांगोळी काढण्यात आली. पाटावर अक्षतांचे मंडल (उंचवटा) केले गेले व त्यावर हळदी कुंकुवाने स्वस्तिक चितारण्यात आले.
छताची दोन कौले सारून त्यामधून गुडी वर सरकविण्यात आली. अतिशय धिम्या पध्दतीने बांबू जमिनीला स्पर्श करू नये याची खबरदारी घेत गुडी उभारण्यात आली व पाटावरील अक्षतांच्या मंडलावर विराजीत करण्यात आली. गुडी कौलांमध्ये घट्ट बांधण्यात आली. कौलांमधून गुढी अशी साजरी दिसत होती.

नंतर गुढीची पंचोपचाराने पूजा करण्यात आली. गुढीला गंध, हळद व कुंकु लावण्यात आले. चाफ्याच्या फ़ुलांचा हार घातला गेला. पंचामृत व साखर यांचा नैवेद्य दाखविला गेला. या पूजनाने गुढी अशी नटली होती.

नंतर या गुढीचे सार्‍यांनी पूजन केले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षीचे वरसलकार श्री. गोपाळराव सावंत उभयता गुढीचे पूजन करतानाचे हे दृश्य.

आपण शहरवासीय नेहमीच गुढीपाडवा दारी तोरण बांधून व श्रीखंड पुरीचा बेत करून साजरा करतो. मी ही आयुष्यात गुढीपाडवा असाच साजरा केला, गुढी उभारण्याचा योग कधी आलाच नव्हता. या संवत्सरी हे शक्य झाले व गुढी पाडवा खर्‍या अर्थाने साजरा केल्याच्या आनंदाने मन भरून पावले. आपल्या प्रत्येकाच्या गाठचा अनुभव असाच असावा. ज्यांनी असा अनुभव घेतला नसेल त्यांना ती अनुभुती यावी, हे मागणे. घरासमोरील गुढीचे हे लोभसवाणे दर्शन.

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ही गुढी उतरविण्यात आली व याचवेळी महाशिवरात्रीला जे अभिषेक पात्र, ज्याला गळती असे संबोघले जाते, तुळशीवृंदावनात ठेवले गेले होते, ते ही काढण्यात आले.

हे झाले प्रथे व परंपरेविषयी आता आपण मिमांसेच्या दृष्टीने गुढीपाडवा या सणाकडे पाहुया.
गुढी उभारणे म्हणजे झेंडावंदन करणे. झेंडा हा जसा आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असतो. त्याप्रमाणे गुढी ही आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे.
आपण पाहिले की गुढी ही मांगल्याने सजलेला कलश, वस्त्र, चाफ्याच्या फुलांचा हार यांनी सजलेली व उंच बांबूच्या टोकावर रचलेली असते. हे प्रत्येक प्रतिक कशाचे ना कशाचे तरी द्योतक आहे.
बांबू हा वंशवृध्दीकारक मानला जातो. कारण आपण जर एक बांबूचे रोप लावले तर त्याच्या सभोवती बांबू मोठयासंख्येने लागलेला दिसतो ज्याला बांबूचे बेट किंवा बांबूचे बन म्हणतात. त्याशिवाय बांबू हा साठ वर्षे झाली तरी तरूण राहतो, साठ एक वर्षानंतर त्याला फुले येतात व नंतर बिया आल्यावर त्याच्या जीवनयात्रेचा शेवट होतो. त्याखेरीज, बांबूच्या पेरावर डोळयासारख्या भागाला वंशलोचन म्हटले जाते व लहान मुलांना कफासाठी देणार्‍या सितोपलादी चूर्णाचा वंशलोचन हा महत्त्वाचा घटक आहे. असा हा बहुगुणी वंशवृध्दीकारक बांबू दारावर गुढी उभारण्यासाठी योग्यच नाही का?
कलशाला आपल्या संस्कृतीत एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. कलशाला वरुण म्हटले जाते. वरुण म्हणजे पावसाचे दैवत. जलाचे आपल्या जीवनात अलौकिक स्थान आहे परिणामी कलशाचे. आपण सत्यनारायणाच्या पूजेत कलशात पाणी भरून वरुण स्थापना करतो व त्यावर विष्णू व अन्य देवता मांडतो. नित्य पूजा कलशाखेरीज होणार नाही. असा समृध्दीकारक कलश.
कलशावर कुंकवाने स्वस्तिक रेखाटला जातो. स्वस्तिक या चिन्हाला आपल्या संस्कृतीत एक अविभाज्य स्थान आहे. कारण स्वस्तिक या चिन्हामध्ये इंद्र, पूषा, अरिष्टनेमी व बृहस्पती ही दैवते असतात.
वसन म्हणजे वस्त्र हे आपल्या वैभवाचे प्रतिक आहे. तर चाफ्याची माळ ही यशाचे प्रतिक आहे.
अशी ही समृध्दी कारक, दैवी, वैभवशाली व यशाची पताका गगनात घेऊन जाणारी गुढी आपण उभारतो व तिची पूजा करतो. दिवसभर ही गुढी गगनात आपल्या घराच्या वैभवाची शान म्हणून मानात मिरवते व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी तिला आपण खाली उतरवतो.

या दिवशी कडुनिंबाला केवळ वर्षभर असणार्‍या पानांशिवाय फुले व फळे देखील असतात. या फुलाफळासकट असणार्‍या पानांचा रस हा अतिशय आरोग्यदायी असतो. जिरे, चिंच व गुळ या गुणवर्धक पदार्थांमुळे येणार्‍या उन्हाळयापासून आपल्या प्रकृतीचा बचाव करणारा असतो.

गुढी पाडवा हे नवीन वर्ष म्हणून आपणा साजरा करतो. वर्षातून दोन पाडवा हे सण येतात. एक गुढी पाडवा तर दुसरा ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो तो दिवाळीतील सण. आपली नवीन वर्षे ही आपण ज्याला Fianancial Years म्हणतो तशी आहेत. गुढी पाडवा हा सण रब्बी हंगामानंतरचे Fianancial Year आहे तर बलिप्रतिपदा हे खरीप हंगामानंतरचे Fiancial Year आहे. कारण शेतकरी पाडव्या आधी, आपली शेतीतून मिळणार्‍या उत्पनातून देणी देवुन टाकतो व नवीन हिशेबाला आरंभ करतो.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रातील सातवाहन राजाने परकीय शकांचा पराभव केला त्या प्रित्यर्थ साजरा केला व तीच प्रथा आपण आजही पाळतो. हा सण आपण उगाचच हिंदु संस्कृतीचा असल्याचा अविर्भाव आपण आणतो. पण हा सण केवळ महाराष्ट्रीय संस्कृतीचा आहे, याची अनुभुती आपणास असेलच.

No comments:

Post a Comment