Tuesday 2 March, 2010

आपले घर म्हणजे प्रभावळकरवाडा


आपले पूर्वज जेव्हा १६५१ मध्ये कुडाळात आले तेव्हा, ४०० वर्षानंतरही आताच बांधल आहे असं वाटावं, असं हे घर त्यांनी उभारलं.

हे आपले अंगण. या अंगणाने पाहिले अनेक सोहळे, आनंदाचे अन प्रसंग, दुःखाचे. आपल्या महापराक्रमी पूर्वजांनी मोठ्या स्वा-यांपूर्वीच्या खलबती इथेच असतील झडविल्या. इथेच जमल्या असतील अनेक मॆफली, ज्यात गाईले असतील पवाडे, पराक्रमाचे. विवाह सोहळे, साखरपूडे, पाचपरतावणे, नामकरणविधी ह्या सा-याच सोहळ्यांचा इथे जडला असेल रंग.


या अंगणामध्येच विराजित आहे, तुळशी वृंदावन. प्रभावळकरांच्या गृहस्वामीनींच श्रध्दास्थान. सौभाग्याच वरदान देणार तुळशी वृंदावन हे हिंदु संस्कृतीच लेणं आहे. स्नानांनंतर तुळशीला पाणी घालणं व प्रदक्षिणा घालणं हे आपण चित्रपटांमध्ये अथवा टी.व्ही. सिरीयल्समध्ये पाहतो. आपल्या घरातील हे वैभव आपल्या कधी ध्यानातच येत नाही.
महाशिवरात्रीला शंकराला अभिषेक देखिल याच तुळशी वृंदावनात केला जातो.


अंगणातून घरात घेऊन जाणारी ही भली मोठी पडवी. पडवीत दिसतेय ती समोरची खोली, ब्राह्मणाची खोली.
आलुतेदार व बलुतेदारांना या पडवीच्या पूढे प्रवेश नव्हता. इथूनच त्यांना त्यांच बलुतं, म्हणजेच वर्षाचा शेतातील वाटा घ्यावा लागे. म्हणजे अभिजनांना पडवीत तर फक्त महाजनांना लोट्यात प्रवेश होता. आपली पादत्राणे येथे आपण काढून ठेवतो कारण लोट्यावर पादत्राणे परिधान करून जाता येत नाही.




पाहुण्यारावळ्यांचा स्वागतकक्ष, म्हणजे लोटा. याच लोट्यावर आमंत्रित स्त्रियांना प्रभावळकरांच्या स्त्रिया हळदीकुंकवाच लेणं देतात, अनेकाविध कार्यक्रम येथे आयोजित होतात. आपल्या पराक्रमाच्या मोहिमांनंतर तसेच दिवसभराच्या कार्यकलापानंतर आपल्या पूर्वजांच्या शिळोप्याच्या गप्पा रंगत असतील येथेच. इथुन देवघरात प्रवेश होतो. घाईघाईत बाहेर जाताना लोट्यातुनच देवाच दर्शन घेता येतं.


सारं जग जेथे नतमस्तक होतं ते हे देवघरं. आपल्या या प्रशस्त देवघरात, आपलं शक्तीस्थान अन जागृत असं दॆवत म्हणजे, आपली श्री भवानी विराजीत आहे. असा प्रवाद आहे की छत्रपती शिवरायांपाशी असलेल्या तलवारींपॆकी भवानी तलवार ही त्यांना आपल्याच पूर्वजांनी दिली असावी. गणेशोत्सव, गौरीपूजन, नवरात्रौत्सव असे अनेक सोहळे येथे आपण अत्यंत आनंदाने पार पाडतो. देवीच्या दर्शनाची दुर्दम्य ओढ आपल्याला नेहमीच साद घालते व याच ओढीने आपण तिचे दर्शन घ्यावयास येतो.


हे जे दिसतयं ना ते आपल्या वाड्यातील सर्वात ऊंच स्थान आहे. माडीवरील वाश्यांवर असणारं हे आहे पाशिट. आणि या पाशिटाला जी बांधलेली आहेत ती आपल्या प्रभावळरांच्या पुरूषांच्या विवाहातील मुंडावळ्या. म्हणजे आपल्या संततीचं वॆवाहिक जीवन नेहमीच सर्वोत्तम सुखाच जावं ही प्रतिकात्मक अंत:प्रेरणा येथे आपल्याला दिसते.


हा आहे होवरा म्हणजे स्वयंपाकघ्रर. येथे प्रभावळकरांच्या पाककलानिपुण गृहस्वामीनी चुलीवर स्वयंपाक करीत. इथे प्रत्येक घराची वेगळी चूल मांडलेली असे. म्हणजे वेगवेगळे पदार्थ येथे एकाच वेळी शिजत. असे अनेकाविध चविष्ट पदार्थ थोडे थोडे जरी पानात पडले तरी जेवणाची काय गंमत असेल, हा विचार करूनच तोंडाला पाणी येऊ लागेल. देवाला रोजचा नॆवेद्य दाखविता यावा म्हणून होव-यातुनच एक द्वार देवघरात उघडते. याखेरीज रोजचे देवदर्शन देखिल स्त्रियांना होव-यातुन घेता येई.


या घराचे अंतःपूर म्हणजे ही वळई, स्त्रियांच्या हक्काची खोली तसेच विश्रांतीस्थान. आपल्या घरातील वास्तूपुरूष येथेच विराजित आहे. पाहुण्यांच्या तसेच आपल्या जेवणाच्या फॆरी येथेच झडतात. वळई ही माडीखाली येत असल्याने, ती नेहमीच थंड असते, एअर कंडीशन्ड रूमच जणु.


चौपटीचे घर, ही आपल्या घराची खरतरं ख्याती. इतक्या मोठ्या घराचा डोलारा या चौपटीशिवाय शक्यच नव्हता. चौपटीच्या दोन्हीबाजुंना छोट्या खोल्या आहेत. ज्यात प्रायव्हसी नक्कीच जपली जात असेल. या चौपटीतून ऊन पावसाचा खेळ घरात रंगतो. चौपटीही जणु एखादा पाणवठा असावा या भ्रमाने चतुर (Dragon fly)आपल्याला नेहमीच चौपटीत झेपावताना दिसतात. कोकणातील पावसाचे रौद्रस्वरुप या चौपटीतुन मात्र मनाला आल्हाद देते.


वळईतुन आत आल्यावर चौपटीच्या बाजुला छोटया आठ खोल्या पसरल्या आहेत. दुस-या बाजुस आहे पाठले दार, हे दार पुढल्या दारापेक्षा फारच छोटे आहे. त्यामुळे जर प्रभावळकर वाड्यात आपला खरा वावर राहिला असेल तर वळईतुन येथे येताना अथवा येथुन पाठच्या दारातून बाहेर जाताना, आपण नतमस्तक झाला नसाल तर आपला कपाळमोक्ष झाला समजा.


एवढ्या मोठ्या घराच न्हाणीघरच जर दाखविलं नाही तर आपला विलक्षण गॆरसमज होईल. इथे प्रत्येक कुटुंबाची वेगळी न्हाणी होती.


हे आहे आपल्या घराचे पूर्वदिशेकडील प्रवेशद्वार. येथुन खळ्यात जाण्याचा मार्ग आहे. खळ्यात पूर्वी पुष्कळ झाडे होती, जणु एखादी आमराईच.

अशी ही प्रभावळकर वाड्याची चित्ररूप सफर, कशी वाटली बरे आपल्याला!

1 comment: