Sunday 7 March, 2010

प्रथा, परंपरा आणि मिमांसा - होळी

नुकताच होळीचा सण पार पडला. होळी हा रंगाचा सण. आनंदाचा दुःखावर विजय म्हणूनही होळी हा सण आपणास ठाऊक आहे.

कोकणात होळीचा सण हा अत्यंत आनंदाने, उत्साहाने, प्रचंड सहभागाने तसेच वैविध्यतेने साजरा केला जातो. प्रत्येक गावागावांतून अनेकाविध प्रथा पाळल्या जातात.
रत्नागिरी जिल्ह्यात तर हा सण अतीव उत्साहात व सहभागात साजरा होतो. गावागावांतून देवतांच्या पालख्या निघतात व या पालखीतून देव घरोघरी नेले जातात. ज्यांच्या घरी ज्या दिवशी देवाची पालखी येते, ते घर शक्यतो खुले ठेवले जाते व त्यासाठी चाकरमानी गावातील आपल्या घरी आवर्जुन येतात.
सिंधुदुर्गातदेखिल हा सण थोड्या वेगळ्या पण वैशिष्ट्यपूर्ण पध्दतींनी साजरा केला जातो.
कुडाळमुक्कामी प्रभावळकरांची होळी देखील आनंदाने साजरी केली गेली.
सांप्रत संवत्सरी प्रभावळकर घराण्यातील श्री. गोपाळ सावंत व त्यांचे पुतणे वरसल साजरी करीत आहेत. या वरसलीच्या कारणाने होळी हा सण जवळून पाहता आला व या सणाचे विश्लेषण करता आले. काही अपरिहार्य कारणास्तव फोटो काढता आले नाहीत तरी क्षमस्व.
प्रभावळकरांची होळी ही माट्याच्या बावी जवळील मोकळ्या भूखंडावर साजरी होते. किंबहुना या वर्षीतरी ती त्या ठिकाणी साजरी झाली व ती याच ठिकाणी साजरी व्हावी या साठी होलिका मातेला उच्चरवाने गार्‍हाणे घातले गेले.
प्रभावळकरांच्या या होळीला एकूण नऊ प्रसाद अर्पण केले जातात. त्यांतील एक आपला, एक टेंबावरच्या प्रभावळकरांचा, दोन सदु अण्णांच्या घरांतील तसेच खाशे, राणे व मोहिते या प्रभावळकरांच्या नातलगांचा, असे हे प्रसाद होत.
आपण मानकरी असल्याने आपल्या नैवेद्याला विशेषत्व आहे. त्यामुळे आपला नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत सजविलेला असतो यात कुकरच्या डब्यातील भात मोठ्या परातीत मध्यभागी ठेवुन त्यात मध्यभागी वाटीतून सांभारे तसेच इतर पदार्थ हे बाजुला आकर्षक पद्धतीत रचलेले असतात. ही रचना खरतरं तसवीरबंद असावयास हवी. हा योगदेखील येईलच.
अर्थातच, मानकरी आपण असल्याने ढोलदेखील आपलाच असतो.
हा प्रसाद होळीला नेताना बरोबर एरंडाचे रोपटे न्यावयाचे असते. अशा प्रकारे नैवेद्य, नैवेद्यावर सोडावयास पाणी, पुरणपोळी व एरंड अशी कसरत करीत आपणास होळीच्या ठिकाणी जावे लागते.
खुशीने न मागता देवु केलेली, मागितल्यामुळे देवु केलेली व मागीतले एक व नेले तीन अशी व न मागताही घेवु केलेली अशी हरप्रकारे मिळवलेली लाकडे रचून ही मोठी होळी रचली जाते.
या होळीसमोर एरंडाचे रोपटे ठेवावयाचे, या एरंडाच्या खोडात पुरणपोळी खोवायची नंतर काही अंतरावर सर्व नैवेद्याची ताटे ठेवावयाची व पाणी सोडून होळीचे पूजन करावयाचे व नंतर होळी पेटवावयाची अशी सर्वसाधारण रीत आहे. हे सर्व घडताना एका बाजूला गावकार हा ढोल बडवित असतो. होळी पेटल्यावर गावकार होळीला ढोल बडवित प्रदक्षिणा घालतो, सहभागी मंडळीतुन उच्चरवात बोंब मारली जाते तसेच गार्‍हाणी घातली जातात. नवसाला पावणारी अशी ही होळी असल्याने अनेक जण आपल्या होळीला गार्‍हाणी घालतात. यावर्षीदेखील मुलाचे अमेरिकेला शिकावयाचे स्वप्नपुरे झाले या कारणपरत्वे होळीला बोकड दिला गेला. अशा तर्‍हेने होळीचा यादिवशीचा सोहळा पार पडतो. नंतर सारेच झोपायला तर काही विशेष जागरण करायला मोकळे होतात.
सकाळी पुन्हा याच होळीच्या ठिकाणी सारे जमा होतात. मानकरी असल्या कारणाने जाताना आपण दोन तळयांत दोन श्रीफळे घेवुन जातो. आपला ढोल घेवुन गावकारदेखील येतो. सर्वजण जमा झाल्यावर गावकार ढोल बडवितो व आपण सारे होळीला प्रदक्षिणा घालतो. होळीची राख एका पिशवीत प्रसाद म्हणून घेतो. व ही प्रदक्षिणा घातल्यावर आपण दोन ढोलांच्या गजरात गावातील देवतांच्या दर्शनाला प्रयाण करतो.
मानकरी या शब्दाचा मुद्दामच पुनरुल्लेख करतो कारण जरी आपण मानकरी असलो तरी आपणास तितकासा मान दिला जात नाही. याला कारण आपल्यातीलच काही लोक असावेत, त्यावर प्रकाश पुन्हा केव्हा तरी.
सर्वप्रथम पाटेश्वराला जातो. तेथे तळी ठेवली जाते. ढोलाला हार घातला जातो. पाटेश्वर हे खाश्यांचे कुलदैवत असल्याने तिथे खाशेमंडळीपैकी कोणाच्या उपस्थिती गार्‍हाणे घातले जाते. एक श्रीफळ वाढवून मग तेथुन आपण वाटेतील कोटेश्वराच्या देवस्थानाकडे एक श्रीफळ वाढवितो, येथे मात्र गार्‍हाणे गावकाराचे होतो. नंतर आपण खाश्यांच्या चौपटीच्या मोठ्या घरात येतो. तेथे आपले स्वागत होते. आपल्याला चहापाणी दिले जाते व दोनही ढोलांचा मान राखला जातो. दोन श्रीफळे दिली जातात त्यातील एक हे तळीत तर दुसरे हे मानाचे असल्याने सोबत घेतले जाते. त्यानंतर आपण ढोलाच्या गजरात केळबाईच्या देवळात येतो. तेथे एका तळीतील एक श्रीफळ वाढविले जाते. तेथुन दोन वेगळे मार्ग स्वीकारले जातात एक लक्ष्मीच्या अवाटात तर दुसरा कुडाळेश्वराच्या देवळाकडे जातो. लक्ष्मीच्या अवाटाकडे जाणारे पथक तळीघेवुन केळबाईचे मानकरी श्री. पारपोलकारयांच्या कडे जातात तेथे त्यांचे स्वागत होते. दोन श्रीफळे देवुन मान ठेवला जातो. त्यातील एक रिकाम्या तळीत ठेवतात तर दुसरे मानाचे म्हणून ठेवले जाते. कुडाळेश्वराचकडे प्रयाण केलेले पथक हे कुडाळेश्वराच्या देवळात एक श्रीफळ वाढविते. तिथुन निघाल्यावर ग्रामदेवतेच्या ब्राह्मणदेवतेकडे आपण जातो. तेथेदेखिल आपले स्वागत होते व रिकाम्या तळीत श्रीफळ ठेवले जाते. रोंबाट काढले जाते, वेगवेगळी सोंगे घेतली जातात व शबय शबय करीत घरोघरी पोस्त मागितला जातो.

येथवर आपण होळीची प्रथा व परंपरा यांचा विचार केला. आता आपण मिमांसेकडे वळू.
यासणाची एकूण रुपरेषा जाणल्यावर आपणास ठाव येतो की होळी ही खरेतरं एक चिताच आहे. होलिकेची व प्रल्हादाची. आपणास हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा प्रल्हादाची गोष्ट ठावूक असेलच. या हिरण्यकश्यपू राक्षसाची बहिण म्हणजे प्रल्हादाची आत्या त्याला मारण्यासाठी प्रल्हादाला मांडीवर घेवून चितेवर बसते व तिला पेटविले जाते, तिच ही होळी.
आपणास एक म्हण ठावुक असेल की "ऊंच वाढला एरंड तरी का होई इक्षुदंड". या म्हणीत एरंड व इक्षुदंड यांची तुलना केलेली आहे. कारण एरंड व इक्षुदंड म्हणजे ऊस हे जरी दोघेही ऊंच वाढले तरी उसाची तुलना एरंडाला कशी येईल, कारण ऊस हा गोड असतो, एरंड नव्हे. साम्यधर्मम्हणून एरंड व ऊस या दोहांनाही फुले येत नाही व दोन्ही पुरुषप्रधान आहेत. म्हणून अविवाहीत पुरुषाचे प्रतिकरूप म्हणून आपल्या संस्कृतीत ऊसाचा तसेच एरंडाचा वापर करतो. सद्‍गुणाचे प्रतिक म्हणून इक्षुदंड तर दुर्गुणाचा द्योतक म्हणून एरंड. प्रल्हाद हा ईश्वरीगुण संपन्न असला तरी तो एक राक्षस होता, म्हणून एरंड हा प्रल्हादाचे प्रतिकस्वरुप आपण पुजतो. आपल्या घरातून हा एरंड म्हणजे प्रतिकरूप प्रल्हाद घेवुन जाताना आपण ढोलाच्या गजरात घेवून जातो. कारण ती प्रल्हादाला अंतिम प्रवासाकडे नेणारी प्रतिकात्मक यात्रा असते. हा एरंड जेव्हा आपण होळीमध्ये ठेवतो तेव्हा त्या अंतिमप्रवासासाठी त्याचे तोंड गोड करण्यासाठी म्हणून आपण प्रल्हादाला पुरणपोळी तोंडात भरवावी अशा प्रतिकस्वरूप त्या एरंडात पुरणपोळी खोवतो.
या होळीतून वाईटाचा नाश होतो व चांगलेच निष्पन्न होते म्हणून होळीसमोर गार्‍हाणी सांगितली जातात व वाईटातून चांगलेच होत असल्यामुळे एकतर होळीसमोर वाईट गुण त्याजुन चांगल्या मनाने जावयाचे असते तसेच सत्‌प्रवृत्तीने केलेली गार्‍हाणी ही होलिकामाता पूर्ण करीत असल्याची श्रध्दा आहे.
होळी पेटविल्यावर होळी सभोवती गावकार प्रदक्षिणा घालतो व होळीचे एकप्रकारे संरक्षण करतो. आपणास एक दिवसाचे सुतक पाळावयाचे असल्याने आपण होळी पेटवून घरी येतो व दुसर्‍या दिवशी मात्र होळी सभोवती प्रदक्षिणा घालून सुतक संपवितो व देवदर्शनासाठी प्रयाण करतो.

हे झाले होळीविषयी आता आपण गावप्रथेकडे वळू. खाशे हे बारा पाचातील प्रमुख असल्यामुळे आपण प्रथम त्यांच्या दैवतेकडे जातो म्हणजेच पाटेश्वराकडे, खाशांचे दैवत हे महाजनांपैकी असल्याने तेथे गार्‍हाणे हे खाश्यांसमोर आपणच घालतो, कोटेश्वर हे अधिजनांचे म्हणजे सर्वसामान्यांचे, चुकल्यामाकलेल्यांचे ग्रामदैवत असल्याने तेथे मात्र गावकाराचे गार्‍हाणे चालते. नंतर आपण ग्रामदेवता केळबाई, ग्रामदैवत कुडाळेश्वर या दैवतांपाशी जातो.
ही झाले आपल्या परंपरेविषयी. आतापर्यंत आपल्या ध्यानात होळीचे हे स्वरुप आले असेल तर आपल्याला हे देखिल उमजले असेल की होळी ही काही ठिकाणी दोन दिवसाची, काही ठिकाणी पाच दिवसांची तर काही ठिकाणी अकरा दिवसांची का असते. सुतक जसे आपण काही दिवसांचे पाळतो तशीच ही प्रथा असावी.

आता आपण होळीचे आपल्या जीवनातील मनोवैज्ञानिक महत्व जाणून घेवु.
"रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे जीवनाचे सार्थ वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केले आहे. रामदासस्वामी म्हणतात की "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना सर्व शोधोनि पाही." तर बहीणाबाई चौधरींनी म्हटले आहे की "सुख जवा एवढे तर दुःख हे डोंगरा एवढे" आपल्या दैनंदिन जीवनात सुखाचे अनेक प्रसंग येतात तर उरला दिवस आपण कोणाचे ना कोणाचे टक्केटोणपे खात असतो. ही जी दुःखाची सल असते ती मनाच्या कोपर्‍या मध्ये जमा होत असते ही जमा होणारी दुःखाची सल म्हणजे दुःखाच्या आठवणींचा निचरा वेळॊवेळी करावयाचा असतो. असा निचरा करण्यास Catharcism असे म्हटले जाते. निखळपणे हसणे किंवा दुःखातिरेकाने रडणे अशारितीने हा दुःखाचा निचरा करावयाचा असतो. कारण असा निचरा न केल्यास मनावरील ताण वाढत असतो. आजकाल असा दुःखाच्या भावनांचा निचरा होत नसल्याने किंबहुना दुःखाची भावना आधिक वाढल्याने, त्याची परिणतीस्वरुप आजचे depression सारखे मनोरोग होत असतात. आपल्या हिंदु धर्मात दुःखाच्या अश्या भावनांचे catharsis (भावनांचे उत्सर्जन) व्हावे अशी प्रसंगानुरुप सोय केलेली आहे. मृत व्यक्तीच्या सांत्वनाला जावून ऊर मोकळा करणे हे देखिल एक प्रकारचे catharsis होय. होळीचा सण हा catharsis चा उत्कृष्ट नमुना आहे. होळीमुळे केवळ catharsis होऊन दुःखाचा भार वर्षभरासाठी हलकाच होत नाही तर आजकाल आपण ज्याला adrenalin rush म्हणतो ते देखिल होळीमुळे साध्य होते.

या काळात थंडी दूर जाते म्हणून थंडीला पळविण्याचे होळीचे कार्य आहेच. येथे आपण एक ध्यानात घ्यावयास हवे की पूर्वीपेक्षा आता ऋतु हे लवकर येत असल्याने, सांप्रत थंडी ही लवकर येते व होळीच्या आधीच संपते.

या खेरीज होळी हा रंगांचा सण आहे, वसंताचे आगमन व त्यातील हर्षोल्हास साजरा करणारा हा सण आहे. रंगांची उधळण ही वर उल्लेखिल्याप्रमाणे adrenalin rush साठी कारण ठरते. या सणाचा रब्बीच्या हंगामाशी ही संबंध जोडता येतो. शेतात जेव्हा उभे पीक असते, तेव्हा सर्व जाती जमातींमध्ये एकसंघता प्राप्त व्हावी म्हणून असे सामुदायिक सण हे शेतीच्या हंगामात साजरे केले जातात. होळीचा हा सण देखील सामुहीक ऎक्याचा व सद्‍भावनांचा प्रतिकात्मक सण आहे.

असे हे होळीचे पारंपारिक व मनोवैज्ञानिक महत्व आहे.

मला खात्री आहे की होळीचे हे महत्व जाणल्याने, पुढल्या वर्षीपासून होळीचा सण आपण सर्वजण अधिकच हर्षोल्हासात साजरा कराल व मनातील भार हलका करून आनंदाचे जीवन व्यतीत कराल वा सार्‍यांच्याच जीवनातील आनंदाची ज्योत पेटवाल.
आपणास होळीच्या उशीरा का होईना हार्दिक शुभेच्छा.

काही चुकले माकले असल्यास सुधारणेची संधी द्यावी, ही ईच्छा.

3 comments:

  1. Excelent article, Nandu, the pictures brought the wonderful memories of Kudal visits. And all our elders whom we owe all we have...Keep up the good work!! Nitin/Chicago

    ReplyDelete
  2. Dear Nitin,
    I am sorry for the delay to acknowledge your comment. I appreciate your overwhelming support for this venture.
    I have initiated this blog to bring together our good spirit. It is also an effort to be a watchdog to safeguard our historic home, with your kind support.
    I have many a things in my store and that will come up in time.
    I would also like the others to verbalize and comment than to be a mute spectator.
    With regards from,
    Nandu.

    ReplyDelete
  3. प्रभावळकरजी
    आपला होळीचा लेख वाचला. पण्‍ा त्यात गोंधळ खूप वाटला. होळीचे पारंपारिक व मनोवैज्ञानिक महत्व वगैरे आपण मांडलात. पण नेमकेपण काहीच आढळले नाही. होळी ही गावपरंपरा म्हणून ठिक आहे. पण्‍ा त्यात दरवर्षी जंगलातली किंवा कुणाच्या तरी कुडणातली झाडे बिनदिक्कत तोडून नेता. त्याबददल काय? होळी आणताना ज्याच्याशी पूर्ववैमनस्य असते, अथवा जी व्यक्ती होळीला उपस्थित राहू शकत नसेल तिला शिव्या घातल्या जातात त्याचाही उल्लेख लेखात हवा होता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आणखी किती वर्षे असे वृक्ष तोडून होळी साजरया करणार आहात. फक्त कोकणात दरवर्षी पंधरा हजाराहून आधिक होळया तेवढीच झाडे तोडून साजरी होतात. याऐवजी दरवर्षी आपल्या मोकळया भूखंडावर झाडे लावून आणि जगवून होळी कधी साजरी करणार

    ReplyDelete