Wednesday 17 March, 2010

प्रथा, परंपरा आणि मिमांसा - गुढी पाडवा

महाराष्ट्रातील हिंदु नववर्षाप्रित्यर्थ गुढीपाडवा हा सण साजरा करतात तर याच दिवशी आंध्रप्रदेशातील व दक्षिणेतील काही भागातील लोक नवीन वर्ष उगाडी यानावाने साजरा करतात. प्रत्येक भागातील सण साजरा करण्याच्या प्रथा वेगळया आहेत, हे आपण जाणताच.

महाराष्ट्रातील गुढीपाडवा या नववर्षदिनी घरासमोर गुढी उभारली जाते. कडुनिबांच्या पानांमध्ये जिरे, गुळ आणि चिंच मिसळुन बारीक पेस्ट केली जाते व ती सकाळी उठल्यावर खाल्ली जाते.

कुडाळ मुक्कामी गुढी पाडवा हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला. श्री. प्रकाश याने स्वप्रयत्नाने उंच ताशीव बांबू आणला गेला. हा बांबु आणताना तो जमिनीला टेकू नये याची विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी हा बांबू दोन स्टूलांवर ठेऊन तो स्वच्छ करून त्यावर गडु घट्ट बसावा म्हणून त्याला लाल फडके सुतळीने गुंडाळले गेले. गडुवर हळद, कुंकु यांनी स्वस्तिक वगैरे हिंदु धर्मातील शुभचिन्हे रेखाटली गेली. गडू म्हणजेच कलश फुलांनी सजविला गेला. नवीन वस्त्र त्या गडुखाली ठेवले गेले व तो गडू उभ्या केलेल्या वेळुवर घट्ट बसविला गेला. त्याला गावठी चाफ्याच्या फ़ुलांचा हार घातला गेला.
तत्पूर्वी गुडीच्या खालील जागा शेणाने स्वच्छ सारविली गेली. सारविलेल्या जमिनीवर लाल रंगाचा पाट ठेवला गेला. पाटासभोवती रांगोळी काढण्यात आली. पाटावर अक्षतांचे मंडल (उंचवटा) केले गेले व त्यावर हळदी कुंकुवाने स्वस्तिक चितारण्यात आले.
छताची दोन कौले सारून त्यामधून गुडी वर सरकविण्यात आली. अतिशय धिम्या पध्दतीने बांबू जमिनीला स्पर्श करू नये याची खबरदारी घेत गुडी उभारण्यात आली व पाटावरील अक्षतांच्या मंडलावर विराजीत करण्यात आली. गुडी कौलांमध्ये घट्ट बांधण्यात आली. कौलांमधून गुढी अशी साजरी दिसत होती.

नंतर गुढीची पंचोपचाराने पूजा करण्यात आली. गुढीला गंध, हळद व कुंकु लावण्यात आले. चाफ्याच्या फ़ुलांचा हार घातला गेला. पंचामृत व साखर यांचा नैवेद्य दाखविला गेला. या पूजनाने गुढी अशी नटली होती.

नंतर या गुढीचे सार्‍यांनी पूजन केले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षीचे वरसलकार श्री. गोपाळराव सावंत उभयता गुढीचे पूजन करतानाचे हे दृश्य.

आपण शहरवासीय नेहमीच गुढीपाडवा दारी तोरण बांधून व श्रीखंड पुरीचा बेत करून साजरा करतो. मी ही आयुष्यात गुढीपाडवा असाच साजरा केला, गुढी उभारण्याचा योग कधी आलाच नव्हता. या संवत्सरी हे शक्य झाले व गुढी पाडवा खर्‍या अर्थाने साजरा केल्याच्या आनंदाने मन भरून पावले. आपल्या प्रत्येकाच्या गाठचा अनुभव असाच असावा. ज्यांनी असा अनुभव घेतला नसेल त्यांना ती अनुभुती यावी, हे मागणे. घरासमोरील गुढीचे हे लोभसवाणे दर्शन.

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ही गुढी उतरविण्यात आली व याचवेळी महाशिवरात्रीला जे अभिषेक पात्र, ज्याला गळती असे संबोघले जाते, तुळशीवृंदावनात ठेवले गेले होते, ते ही काढण्यात आले.

हे झाले प्रथे व परंपरेविषयी आता आपण मिमांसेच्या दृष्टीने गुढीपाडवा या सणाकडे पाहुया.
गुढी उभारणे म्हणजे झेंडावंदन करणे. झेंडा हा जसा आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असतो. त्याप्रमाणे गुढी ही आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे.
आपण पाहिले की गुढी ही मांगल्याने सजलेला कलश, वस्त्र, चाफ्याच्या फुलांचा हार यांनी सजलेली व उंच बांबूच्या टोकावर रचलेली असते. हे प्रत्येक प्रतिक कशाचे ना कशाचे तरी द्योतक आहे.
बांबू हा वंशवृध्दीकारक मानला जातो. कारण आपण जर एक बांबूचे रोप लावले तर त्याच्या सभोवती बांबू मोठयासंख्येने लागलेला दिसतो ज्याला बांबूचे बेट किंवा बांबूचे बन म्हणतात. त्याशिवाय बांबू हा साठ वर्षे झाली तरी तरूण राहतो, साठ एक वर्षानंतर त्याला फुले येतात व नंतर बिया आल्यावर त्याच्या जीवनयात्रेचा शेवट होतो. त्याखेरीज, बांबूच्या पेरावर डोळयासारख्या भागाला वंशलोचन म्हटले जाते व लहान मुलांना कफासाठी देणार्‍या सितोपलादी चूर्णाचा वंशलोचन हा महत्त्वाचा घटक आहे. असा हा बहुगुणी वंशवृध्दीकारक बांबू दारावर गुढी उभारण्यासाठी योग्यच नाही का?
कलशाला आपल्या संस्कृतीत एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. कलशाला वरुण म्हटले जाते. वरुण म्हणजे पावसाचे दैवत. जलाचे आपल्या जीवनात अलौकिक स्थान आहे परिणामी कलशाचे. आपण सत्यनारायणाच्या पूजेत कलशात पाणी भरून वरुण स्थापना करतो व त्यावर विष्णू व अन्य देवता मांडतो. नित्य पूजा कलशाखेरीज होणार नाही. असा समृध्दीकारक कलश.
कलशावर कुंकवाने स्वस्तिक रेखाटला जातो. स्वस्तिक या चिन्हाला आपल्या संस्कृतीत एक अविभाज्य स्थान आहे. कारण स्वस्तिक या चिन्हामध्ये इंद्र, पूषा, अरिष्टनेमी व बृहस्पती ही दैवते असतात.
वसन म्हणजे वस्त्र हे आपल्या वैभवाचे प्रतिक आहे. तर चाफ्याची माळ ही यशाचे प्रतिक आहे.
अशी ही समृध्दी कारक, दैवी, वैभवशाली व यशाची पताका गगनात घेऊन जाणारी गुढी आपण उभारतो व तिची पूजा करतो. दिवसभर ही गुढी गगनात आपल्या घराच्या वैभवाची शान म्हणून मानात मिरवते व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी तिला आपण खाली उतरवतो.

या दिवशी कडुनिंबाला केवळ वर्षभर असणार्‍या पानांशिवाय फुले व फळे देखील असतात. या फुलाफळासकट असणार्‍या पानांचा रस हा अतिशय आरोग्यदायी असतो. जिरे, चिंच व गुळ या गुणवर्धक पदार्थांमुळे येणार्‍या उन्हाळयापासून आपल्या प्रकृतीचा बचाव करणारा असतो.

गुढी पाडवा हे नवीन वर्ष म्हणून आपणा साजरा करतो. वर्षातून दोन पाडवा हे सण येतात. एक गुढी पाडवा तर दुसरा ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो तो दिवाळीतील सण. आपली नवीन वर्षे ही आपण ज्याला Fianancial Years म्हणतो तशी आहेत. गुढी पाडवा हा सण रब्बी हंगामानंतरचे Fianancial Year आहे तर बलिप्रतिपदा हे खरीप हंगामानंतरचे Fiancial Year आहे. कारण शेतकरी पाडव्या आधी, आपली शेतीतून मिळणार्‍या उत्पनातून देणी देवुन टाकतो व नवीन हिशेबाला आरंभ करतो.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रातील सातवाहन राजाने परकीय शकांचा पराभव केला त्या प्रित्यर्थ साजरा केला व तीच प्रथा आपण आजही पाळतो. हा सण आपण उगाचच हिंदु संस्कृतीचा असल्याचा अविर्भाव आपण आणतो. पण हा सण केवळ महाराष्ट्रीय संस्कृतीचा आहे, याची अनुभुती आपणास असेलच.

Friday 12 March, 2010

अंत:करणपूर्वक शुभेच्छा संदेश उभयतांना

संदेशचे लगीन कुडाळ मुक्कामी थाटात पार पडले. अनेकांनी हा हृद्द सोहळा याची देही याची डोळा पाहिला. आपल्यापैकी अनेकजण या धावत्या जगातील कार्यकलापामुळे सोहळ्यास उपस्थित राहु शकले नाहीत, त्यामुळे त्यांना संदेशचे हे राजबिंडे दर्शन चुकले.

या नवपरिणीत दांपत्याला संसाराची वाटचाल सुगम करण्यासाठी अनेक शुभाशिर्वाद लाभावेत अशीच प्रत्येकाची इच्छा असणार. यास्तव संदेश आणि उभयतांना आपण अनेक शुभाशिर्वाद देवू.
तो सर्वज्ञ, सर्वशक्तिशाली आणि सर्वव्यापी परमेश्वर या नवपरिणीतांच्या सदैव पाठीशी उभा राहो व त्यांचे अडीअडचणींपासून रक्षण करो, त्यांना अक्षय धनप्राप्ती होवो,पराक्रमी संततीचा लाभ होवो आणि या उभयतांत अविरत प्रेम राहो, ही त्या जगन्नियंत्यापाशी प्रार्थना.

या दोहोंमधील रेशमाचे बंध हे फेव्हीकॉलने जोडले जावेत व आपण सार्‍यांनी म्हणावे की ये फेव्हिकॉल का जोड है, टुटेगा नही.

Sunday 7 March, 2010

प्रथा, परंपरा आणि मिमांसा - होळी

नुकताच होळीचा सण पार पडला. होळी हा रंगाचा सण. आनंदाचा दुःखावर विजय म्हणूनही होळी हा सण आपणास ठाऊक आहे.

कोकणात होळीचा सण हा अत्यंत आनंदाने, उत्साहाने, प्रचंड सहभागाने तसेच वैविध्यतेने साजरा केला जातो. प्रत्येक गावागावांतून अनेकाविध प्रथा पाळल्या जातात.
रत्नागिरी जिल्ह्यात तर हा सण अतीव उत्साहात व सहभागात साजरा होतो. गावागावांतून देवतांच्या पालख्या निघतात व या पालखीतून देव घरोघरी नेले जातात. ज्यांच्या घरी ज्या दिवशी देवाची पालखी येते, ते घर शक्यतो खुले ठेवले जाते व त्यासाठी चाकरमानी गावातील आपल्या घरी आवर्जुन येतात.
सिंधुदुर्गातदेखिल हा सण थोड्या वेगळ्या पण वैशिष्ट्यपूर्ण पध्दतींनी साजरा केला जातो.
कुडाळमुक्कामी प्रभावळकरांची होळी देखील आनंदाने साजरी केली गेली.
सांप्रत संवत्सरी प्रभावळकर घराण्यातील श्री. गोपाळ सावंत व त्यांचे पुतणे वरसल साजरी करीत आहेत. या वरसलीच्या कारणाने होळी हा सण जवळून पाहता आला व या सणाचे विश्लेषण करता आले. काही अपरिहार्य कारणास्तव फोटो काढता आले नाहीत तरी क्षमस्व.
प्रभावळकरांची होळी ही माट्याच्या बावी जवळील मोकळ्या भूखंडावर साजरी होते. किंबहुना या वर्षीतरी ती त्या ठिकाणी साजरी झाली व ती याच ठिकाणी साजरी व्हावी या साठी होलिका मातेला उच्चरवाने गार्‍हाणे घातले गेले.
प्रभावळकरांच्या या होळीला एकूण नऊ प्रसाद अर्पण केले जातात. त्यांतील एक आपला, एक टेंबावरच्या प्रभावळकरांचा, दोन सदु अण्णांच्या घरांतील तसेच खाशे, राणे व मोहिते या प्रभावळकरांच्या नातलगांचा, असे हे प्रसाद होत.
आपण मानकरी असल्याने आपल्या नैवेद्याला विशेषत्व आहे. त्यामुळे आपला नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत सजविलेला असतो यात कुकरच्या डब्यातील भात मोठ्या परातीत मध्यभागी ठेवुन त्यात मध्यभागी वाटीतून सांभारे तसेच इतर पदार्थ हे बाजुला आकर्षक पद्धतीत रचलेले असतात. ही रचना खरतरं तसवीरबंद असावयास हवी. हा योगदेखील येईलच.
अर्थातच, मानकरी आपण असल्याने ढोलदेखील आपलाच असतो.
हा प्रसाद होळीला नेताना बरोबर एरंडाचे रोपटे न्यावयाचे असते. अशा प्रकारे नैवेद्य, नैवेद्यावर सोडावयास पाणी, पुरणपोळी व एरंड अशी कसरत करीत आपणास होळीच्या ठिकाणी जावे लागते.
खुशीने न मागता देवु केलेली, मागितल्यामुळे देवु केलेली व मागीतले एक व नेले तीन अशी व न मागताही घेवु केलेली अशी हरप्रकारे मिळवलेली लाकडे रचून ही मोठी होळी रचली जाते.
या होळीसमोर एरंडाचे रोपटे ठेवावयाचे, या एरंडाच्या खोडात पुरणपोळी खोवायची नंतर काही अंतरावर सर्व नैवेद्याची ताटे ठेवावयाची व पाणी सोडून होळीचे पूजन करावयाचे व नंतर होळी पेटवावयाची अशी सर्वसाधारण रीत आहे. हे सर्व घडताना एका बाजूला गावकार हा ढोल बडवित असतो. होळी पेटल्यावर गावकार होळीला ढोल बडवित प्रदक्षिणा घालतो, सहभागी मंडळीतुन उच्चरवात बोंब मारली जाते तसेच गार्‍हाणी घातली जातात. नवसाला पावणारी अशी ही होळी असल्याने अनेक जण आपल्या होळीला गार्‍हाणी घालतात. यावर्षीदेखील मुलाचे अमेरिकेला शिकावयाचे स्वप्नपुरे झाले या कारणपरत्वे होळीला बोकड दिला गेला. अशा तर्‍हेने होळीचा यादिवशीचा सोहळा पार पडतो. नंतर सारेच झोपायला तर काही विशेष जागरण करायला मोकळे होतात.
सकाळी पुन्हा याच होळीच्या ठिकाणी सारे जमा होतात. मानकरी असल्या कारणाने जाताना आपण दोन तळयांत दोन श्रीफळे घेवुन जातो. आपला ढोल घेवुन गावकारदेखील येतो. सर्वजण जमा झाल्यावर गावकार ढोल बडवितो व आपण सारे होळीला प्रदक्षिणा घालतो. होळीची राख एका पिशवीत प्रसाद म्हणून घेतो. व ही प्रदक्षिणा घातल्यावर आपण दोन ढोलांच्या गजरात गावातील देवतांच्या दर्शनाला प्रयाण करतो.
मानकरी या शब्दाचा मुद्दामच पुनरुल्लेख करतो कारण जरी आपण मानकरी असलो तरी आपणास तितकासा मान दिला जात नाही. याला कारण आपल्यातीलच काही लोक असावेत, त्यावर प्रकाश पुन्हा केव्हा तरी.
सर्वप्रथम पाटेश्वराला जातो. तेथे तळी ठेवली जाते. ढोलाला हार घातला जातो. पाटेश्वर हे खाश्यांचे कुलदैवत असल्याने तिथे खाशेमंडळीपैकी कोणाच्या उपस्थिती गार्‍हाणे घातले जाते. एक श्रीफळ वाढवून मग तेथुन आपण वाटेतील कोटेश्वराच्या देवस्थानाकडे एक श्रीफळ वाढवितो, येथे मात्र गार्‍हाणे गावकाराचे होतो. नंतर आपण खाश्यांच्या चौपटीच्या मोठ्या घरात येतो. तेथे आपले स्वागत होते. आपल्याला चहापाणी दिले जाते व दोनही ढोलांचा मान राखला जातो. दोन श्रीफळे दिली जातात त्यातील एक हे तळीत तर दुसरे हे मानाचे असल्याने सोबत घेतले जाते. त्यानंतर आपण ढोलाच्या गजरात केळबाईच्या देवळात येतो. तेथे एका तळीतील एक श्रीफळ वाढविले जाते. तेथुन दोन वेगळे मार्ग स्वीकारले जातात एक लक्ष्मीच्या अवाटात तर दुसरा कुडाळेश्वराच्या देवळाकडे जातो. लक्ष्मीच्या अवाटाकडे जाणारे पथक तळीघेवुन केळबाईचे मानकरी श्री. पारपोलकारयांच्या कडे जातात तेथे त्यांचे स्वागत होते. दोन श्रीफळे देवुन मान ठेवला जातो. त्यातील एक रिकाम्या तळीत ठेवतात तर दुसरे मानाचे म्हणून ठेवले जाते. कुडाळेश्वराचकडे प्रयाण केलेले पथक हे कुडाळेश्वराच्या देवळात एक श्रीफळ वाढविते. तिथुन निघाल्यावर ग्रामदेवतेच्या ब्राह्मणदेवतेकडे आपण जातो. तेथेदेखिल आपले स्वागत होते व रिकाम्या तळीत श्रीफळ ठेवले जाते. रोंबाट काढले जाते, वेगवेगळी सोंगे घेतली जातात व शबय शबय करीत घरोघरी पोस्त मागितला जातो.

येथवर आपण होळीची प्रथा व परंपरा यांचा विचार केला. आता आपण मिमांसेकडे वळू.
यासणाची एकूण रुपरेषा जाणल्यावर आपणास ठाव येतो की होळी ही खरेतरं एक चिताच आहे. होलिकेची व प्रल्हादाची. आपणास हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा प्रल्हादाची गोष्ट ठावूक असेलच. या हिरण्यकश्यपू राक्षसाची बहिण म्हणजे प्रल्हादाची आत्या त्याला मारण्यासाठी प्रल्हादाला मांडीवर घेवून चितेवर बसते व तिला पेटविले जाते, तिच ही होळी.
आपणास एक म्हण ठावुक असेल की "ऊंच वाढला एरंड तरी का होई इक्षुदंड". या म्हणीत एरंड व इक्षुदंड यांची तुलना केलेली आहे. कारण एरंड व इक्षुदंड म्हणजे ऊस हे जरी दोघेही ऊंच वाढले तरी उसाची तुलना एरंडाला कशी येईल, कारण ऊस हा गोड असतो, एरंड नव्हे. साम्यधर्मम्हणून एरंड व ऊस या दोहांनाही फुले येत नाही व दोन्ही पुरुषप्रधान आहेत. म्हणून अविवाहीत पुरुषाचे प्रतिकरूप म्हणून आपल्या संस्कृतीत ऊसाचा तसेच एरंडाचा वापर करतो. सद्‍गुणाचे प्रतिक म्हणून इक्षुदंड तर दुर्गुणाचा द्योतक म्हणून एरंड. प्रल्हाद हा ईश्वरीगुण संपन्न असला तरी तो एक राक्षस होता, म्हणून एरंड हा प्रल्हादाचे प्रतिकस्वरुप आपण पुजतो. आपल्या घरातून हा एरंड म्हणजे प्रतिकरूप प्रल्हाद घेवुन जाताना आपण ढोलाच्या गजरात घेवून जातो. कारण ती प्रल्हादाला अंतिम प्रवासाकडे नेणारी प्रतिकात्मक यात्रा असते. हा एरंड जेव्हा आपण होळीमध्ये ठेवतो तेव्हा त्या अंतिमप्रवासासाठी त्याचे तोंड गोड करण्यासाठी म्हणून आपण प्रल्हादाला पुरणपोळी तोंडात भरवावी अशा प्रतिकस्वरूप त्या एरंडात पुरणपोळी खोवतो.
या होळीतून वाईटाचा नाश होतो व चांगलेच निष्पन्न होते म्हणून होळीसमोर गार्‍हाणी सांगितली जातात व वाईटातून चांगलेच होत असल्यामुळे एकतर होळीसमोर वाईट गुण त्याजुन चांगल्या मनाने जावयाचे असते तसेच सत्‌प्रवृत्तीने केलेली गार्‍हाणी ही होलिकामाता पूर्ण करीत असल्याची श्रध्दा आहे.
होळी पेटविल्यावर होळी सभोवती गावकार प्रदक्षिणा घालतो व होळीचे एकप्रकारे संरक्षण करतो. आपणास एक दिवसाचे सुतक पाळावयाचे असल्याने आपण होळी पेटवून घरी येतो व दुसर्‍या दिवशी मात्र होळी सभोवती प्रदक्षिणा घालून सुतक संपवितो व देवदर्शनासाठी प्रयाण करतो.

हे झाले होळीविषयी आता आपण गावप्रथेकडे वळू. खाशे हे बारा पाचातील प्रमुख असल्यामुळे आपण प्रथम त्यांच्या दैवतेकडे जातो म्हणजेच पाटेश्वराकडे, खाशांचे दैवत हे महाजनांपैकी असल्याने तेथे गार्‍हाणे हे खाश्यांसमोर आपणच घालतो, कोटेश्वर हे अधिजनांचे म्हणजे सर्वसामान्यांचे, चुकल्यामाकलेल्यांचे ग्रामदैवत असल्याने तेथे मात्र गावकाराचे गार्‍हाणे चालते. नंतर आपण ग्रामदेवता केळबाई, ग्रामदैवत कुडाळेश्वर या दैवतांपाशी जातो.
ही झाले आपल्या परंपरेविषयी. आतापर्यंत आपल्या ध्यानात होळीचे हे स्वरुप आले असेल तर आपल्याला हे देखिल उमजले असेल की होळी ही काही ठिकाणी दोन दिवसाची, काही ठिकाणी पाच दिवसांची तर काही ठिकाणी अकरा दिवसांची का असते. सुतक जसे आपण काही दिवसांचे पाळतो तशीच ही प्रथा असावी.

आता आपण होळीचे आपल्या जीवनातील मनोवैज्ञानिक महत्व जाणून घेवु.
"रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे जीवनाचे सार्थ वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केले आहे. रामदासस्वामी म्हणतात की "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना सर्व शोधोनि पाही." तर बहीणाबाई चौधरींनी म्हटले आहे की "सुख जवा एवढे तर दुःख हे डोंगरा एवढे" आपल्या दैनंदिन जीवनात सुखाचे अनेक प्रसंग येतात तर उरला दिवस आपण कोणाचे ना कोणाचे टक्केटोणपे खात असतो. ही जी दुःखाची सल असते ती मनाच्या कोपर्‍या मध्ये जमा होत असते ही जमा होणारी दुःखाची सल म्हणजे दुःखाच्या आठवणींचा निचरा वेळॊवेळी करावयाचा असतो. असा निचरा करण्यास Catharcism असे म्हटले जाते. निखळपणे हसणे किंवा दुःखातिरेकाने रडणे अशारितीने हा दुःखाचा निचरा करावयाचा असतो. कारण असा निचरा न केल्यास मनावरील ताण वाढत असतो. आजकाल असा दुःखाच्या भावनांचा निचरा होत नसल्याने किंबहुना दुःखाची भावना आधिक वाढल्याने, त्याची परिणतीस्वरुप आजचे depression सारखे मनोरोग होत असतात. आपल्या हिंदु धर्मात दुःखाच्या अश्या भावनांचे catharsis (भावनांचे उत्सर्जन) व्हावे अशी प्रसंगानुरुप सोय केलेली आहे. मृत व्यक्तीच्या सांत्वनाला जावून ऊर मोकळा करणे हे देखिल एक प्रकारचे catharsis होय. होळीचा सण हा catharsis चा उत्कृष्ट नमुना आहे. होळीमुळे केवळ catharsis होऊन दुःखाचा भार वर्षभरासाठी हलकाच होत नाही तर आजकाल आपण ज्याला adrenalin rush म्हणतो ते देखिल होळीमुळे साध्य होते.

या काळात थंडी दूर जाते म्हणून थंडीला पळविण्याचे होळीचे कार्य आहेच. येथे आपण एक ध्यानात घ्यावयास हवे की पूर्वीपेक्षा आता ऋतु हे लवकर येत असल्याने, सांप्रत थंडी ही लवकर येते व होळीच्या आधीच संपते.

या खेरीज होळी हा रंगांचा सण आहे, वसंताचे आगमन व त्यातील हर्षोल्हास साजरा करणारा हा सण आहे. रंगांची उधळण ही वर उल्लेखिल्याप्रमाणे adrenalin rush साठी कारण ठरते. या सणाचा रब्बीच्या हंगामाशी ही संबंध जोडता येतो. शेतात जेव्हा उभे पीक असते, तेव्हा सर्व जाती जमातींमध्ये एकसंघता प्राप्त व्हावी म्हणून असे सामुदायिक सण हे शेतीच्या हंगामात साजरे केले जातात. होळीचा हा सण देखील सामुहीक ऎक्याचा व सद्‍भावनांचा प्रतिकात्मक सण आहे.

असे हे होळीचे पारंपारिक व मनोवैज्ञानिक महत्व आहे.

मला खात्री आहे की होळीचे हे महत्व जाणल्याने, पुढल्या वर्षीपासून होळीचा सण आपण सर्वजण अधिकच हर्षोल्हासात साजरा कराल व मनातील भार हलका करून आनंदाचे जीवन व्यतीत कराल वा सार्‍यांच्याच जीवनातील आनंदाची ज्योत पेटवाल.
आपणास होळीच्या उशीरा का होईना हार्दिक शुभेच्छा.

काही चुकले माकले असल्यास सुधारणेची संधी द्यावी, ही ईच्छा.

Tuesday 2 March, 2010

आपले घर म्हणजे प्रभावळकरवाडा


आपले पूर्वज जेव्हा १६५१ मध्ये कुडाळात आले तेव्हा, ४०० वर्षानंतरही आताच बांधल आहे असं वाटावं, असं हे घर त्यांनी उभारलं.

हे आपले अंगण. या अंगणाने पाहिले अनेक सोहळे, आनंदाचे अन प्रसंग, दुःखाचे. आपल्या महापराक्रमी पूर्वजांनी मोठ्या स्वा-यांपूर्वीच्या खलबती इथेच असतील झडविल्या. इथेच जमल्या असतील अनेक मॆफली, ज्यात गाईले असतील पवाडे, पराक्रमाचे. विवाह सोहळे, साखरपूडे, पाचपरतावणे, नामकरणविधी ह्या सा-याच सोहळ्यांचा इथे जडला असेल रंग.


या अंगणामध्येच विराजित आहे, तुळशी वृंदावन. प्रभावळकरांच्या गृहस्वामीनींच श्रध्दास्थान. सौभाग्याच वरदान देणार तुळशी वृंदावन हे हिंदु संस्कृतीच लेणं आहे. स्नानांनंतर तुळशीला पाणी घालणं व प्रदक्षिणा घालणं हे आपण चित्रपटांमध्ये अथवा टी.व्ही. सिरीयल्समध्ये पाहतो. आपल्या घरातील हे वैभव आपल्या कधी ध्यानातच येत नाही.
महाशिवरात्रीला शंकराला अभिषेक देखिल याच तुळशी वृंदावनात केला जातो.


अंगणातून घरात घेऊन जाणारी ही भली मोठी पडवी. पडवीत दिसतेय ती समोरची खोली, ब्राह्मणाची खोली.
आलुतेदार व बलुतेदारांना या पडवीच्या पूढे प्रवेश नव्हता. इथूनच त्यांना त्यांच बलुतं, म्हणजेच वर्षाचा शेतातील वाटा घ्यावा लागे. म्हणजे अभिजनांना पडवीत तर फक्त महाजनांना लोट्यात प्रवेश होता. आपली पादत्राणे येथे आपण काढून ठेवतो कारण लोट्यावर पादत्राणे परिधान करून जाता येत नाही.




पाहुण्यारावळ्यांचा स्वागतकक्ष, म्हणजे लोटा. याच लोट्यावर आमंत्रित स्त्रियांना प्रभावळकरांच्या स्त्रिया हळदीकुंकवाच लेणं देतात, अनेकाविध कार्यक्रम येथे आयोजित होतात. आपल्या पराक्रमाच्या मोहिमांनंतर तसेच दिवसभराच्या कार्यकलापानंतर आपल्या पूर्वजांच्या शिळोप्याच्या गप्पा रंगत असतील येथेच. इथुन देवघरात प्रवेश होतो. घाईघाईत बाहेर जाताना लोट्यातुनच देवाच दर्शन घेता येतं.


सारं जग जेथे नतमस्तक होतं ते हे देवघरं. आपल्या या प्रशस्त देवघरात, आपलं शक्तीस्थान अन जागृत असं दॆवत म्हणजे, आपली श्री भवानी विराजीत आहे. असा प्रवाद आहे की छत्रपती शिवरायांपाशी असलेल्या तलवारींपॆकी भवानी तलवार ही त्यांना आपल्याच पूर्वजांनी दिली असावी. गणेशोत्सव, गौरीपूजन, नवरात्रौत्सव असे अनेक सोहळे येथे आपण अत्यंत आनंदाने पार पाडतो. देवीच्या दर्शनाची दुर्दम्य ओढ आपल्याला नेहमीच साद घालते व याच ओढीने आपण तिचे दर्शन घ्यावयास येतो.


हे जे दिसतयं ना ते आपल्या वाड्यातील सर्वात ऊंच स्थान आहे. माडीवरील वाश्यांवर असणारं हे आहे पाशिट. आणि या पाशिटाला जी बांधलेली आहेत ती आपल्या प्रभावळरांच्या पुरूषांच्या विवाहातील मुंडावळ्या. म्हणजे आपल्या संततीचं वॆवाहिक जीवन नेहमीच सर्वोत्तम सुखाच जावं ही प्रतिकात्मक अंत:प्रेरणा येथे आपल्याला दिसते.


हा आहे होवरा म्हणजे स्वयंपाकघ्रर. येथे प्रभावळकरांच्या पाककलानिपुण गृहस्वामीनी चुलीवर स्वयंपाक करीत. इथे प्रत्येक घराची वेगळी चूल मांडलेली असे. म्हणजे वेगवेगळे पदार्थ येथे एकाच वेळी शिजत. असे अनेकाविध चविष्ट पदार्थ थोडे थोडे जरी पानात पडले तरी जेवणाची काय गंमत असेल, हा विचार करूनच तोंडाला पाणी येऊ लागेल. देवाला रोजचा नॆवेद्य दाखविता यावा म्हणून होव-यातुनच एक द्वार देवघरात उघडते. याखेरीज रोजचे देवदर्शन देखिल स्त्रियांना होव-यातुन घेता येई.


या घराचे अंतःपूर म्हणजे ही वळई, स्त्रियांच्या हक्काची खोली तसेच विश्रांतीस्थान. आपल्या घरातील वास्तूपुरूष येथेच विराजित आहे. पाहुण्यांच्या तसेच आपल्या जेवणाच्या फॆरी येथेच झडतात. वळई ही माडीखाली येत असल्याने, ती नेहमीच थंड असते, एअर कंडीशन्ड रूमच जणु.


चौपटीचे घर, ही आपल्या घराची खरतरं ख्याती. इतक्या मोठ्या घराचा डोलारा या चौपटीशिवाय शक्यच नव्हता. चौपटीच्या दोन्हीबाजुंना छोट्या खोल्या आहेत. ज्यात प्रायव्हसी नक्कीच जपली जात असेल. या चौपटीतून ऊन पावसाचा खेळ घरात रंगतो. चौपटीही जणु एखादा पाणवठा असावा या भ्रमाने चतुर (Dragon fly)आपल्याला नेहमीच चौपटीत झेपावताना दिसतात. कोकणातील पावसाचे रौद्रस्वरुप या चौपटीतुन मात्र मनाला आल्हाद देते.


वळईतुन आत आल्यावर चौपटीच्या बाजुला छोटया आठ खोल्या पसरल्या आहेत. दुस-या बाजुस आहे पाठले दार, हे दार पुढल्या दारापेक्षा फारच छोटे आहे. त्यामुळे जर प्रभावळकर वाड्यात आपला खरा वावर राहिला असेल तर वळईतुन येथे येताना अथवा येथुन पाठच्या दारातून बाहेर जाताना, आपण नतमस्तक झाला नसाल तर आपला कपाळमोक्ष झाला समजा.


एवढ्या मोठ्या घराच न्हाणीघरच जर दाखविलं नाही तर आपला विलक्षण गॆरसमज होईल. इथे प्रत्येक कुटुंबाची वेगळी न्हाणी होती.


हे आहे आपल्या घराचे पूर्वदिशेकडील प्रवेशद्वार. येथुन खळ्यात जाण्याचा मार्ग आहे. खळ्यात पूर्वी पुष्कळ झाडे होती, जणु एखादी आमराईच.

अशी ही प्रभावळकर वाड्याची चित्ररूप सफर, कशी वाटली बरे आपल्याला!

Saturday 13 February, 2010

ही आपली प्राजक्ता


मानवाने संस्कृतीच्या प्रांगणात मुशाफिरी सुरू केली अन त्याचा रानटीपणा कुठल्याकुठे पळुन गेला. गायन, वादन व नृत्य अशा कलांचा विकास हा मानवी संस्कृतीचा विकास होय. मानवी संस्कृतीच हे लेणं आपण जपावयाला हवं. आपण कलांचा अभ्यास करावयास हवा तसेच आपल्या मुलांकडूनही कलावॆभव जपावयास हवं.

सांगावयास अभिमान वाटतो की आपल्या घरातील नवी पिढी कलेच वॆभव जपते आहे. आपल्या राजाची (केशव प्रभावळकर)सुकन्या प्राजक्ता ही भरतनाट्यमध्ये विशारद आहे. तब्बल सात वर्षाचा भरतनाट्यमचा अभ्यास तिने केला आहे.
अभ्यासाव्यतिरीक्त काही शिकण्याचा मुलं कंटाळा करतात अन पालकही. कारण मुलांच्या अभ्यासेतर शिक्षणासाठी आईवडिलांना अभ्यासघेण्याव्यतिरीक्त मुलांना क्लासला नेणं आणणं, अशी काम करावयाची असतात. प्राजक्ताच्या भरतनाट्यममागे राजा अन त्याच्या पत्नीचे परिश्रम आहेत, त्यांचीही सात वर्षाची तपश्चर्या आहे.

नववीत शिकणा-या प्राजक्ताने २००७ साली ठाकरे सभागृहात तर २००८ साली दिनानाथ सभागृहात सामुहीक नृत्यात भाग घेतला आहे. उत्तरोत्तर तिची अभ्यास अन कलेच्या प्रांगणात अशीच प्रगती होवो, ही सदिच्छा.

प्राजक्ताच्या नृत्याविष्काराला प्रभावळकरांकडून हजारो कुर्निसात.


Sunday 24 January, 2010

चला वाटुया मनामनातील आनंद !

आपल्या जीवनातील आनंदाचे अनेक प्रसंग आपल्या घरापुरतेच मर्यादित राहतात. मग त्या यशाच्या घटना असोत अथवा आपल्या घरात साजरे होणारे वाढदिवसासारखे समारोह. चला वाटुया असे आनंदाचे प्रसंग, आपल्या माणसांशी, आपल्या या माध्यमातुन.

असे आनंदी प्रसंग कळवा. माझा मॊबाईल क्र. 9987539991, घरचा दुरध्वनी क्र. 022-23523753, ईमेलचा पत्ता anantmsawant@gmail.com तर घरचा पत्ता आहे E/17, बने कंपाऊंड, साने गुरुजी मार्ग, ताडदेव, मुंबई - 400 034 अशा आनंदाच्या प्रसंगाचे फ़ोटो अथवा व्हिडीओज देखील या माध्यमाला सुशोभित करतील.

कारण आपल्या आनंद हा आम्हा सार्‍यांचा आनंद आहे.

आपल्याला या ब्लौगवर लिहावयाचे असल्यास आपला ईमेलचा पत्ता कळवा.

अथर्व अनंत सावंत याचे होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेतील यश

होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेच्या २००९ - २०१० च्या प्रात्यक्षिक परिक्षेत कुमार अथर्व अनंत सावंत हा उत्तीर्ण झाला आहे व त्यानंतरच्या प्रक्ल्प व मुलाखतीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

होमी भाभा बालवॆज्ञानिक परिक्षा ही तीन स्तरांवर घेतली जाते. प्रथम लेखी नंतर प्रात्यक्षिक व त्यानंतर प्रकल्प व मुलाखत असे या परिक्षेचे स्वरुप आहे. लेखी परिक्षेतुन प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ७.५ % विद्यार्थी निवडले जातात. तर प्रात्यक्षिक परीक्षेतुन प्रकल्प व मुलाखतीसाठी १० % विद्यार्थी निवडले जातात. प्रकल्प व मुलाखतीसाठी निवडले गेलेले विद्यार्थी हे रजत पदक पात्र असतात व त्यांची स्पर्धा ही सुवर्ण पदकासाठी असते.

अशा चाळ्णीतुन प्रकल्प व मुलाखतीसाठी निवड झालेल्या अथर्वचे आपण अभिनंदन करुया. त्याला बालवैज्ञानिक परिक्षेत रजत पदक मिळाले आहेच. पण सुवर्ण पदकासाठी त्याला आपण सुयश चिंतुया !